You can listen to this on https://www.dropbox.com/s/effzuvgw6twx4d0/Lapandav2.wav?dl=0
किती ते सरळ, साधं, सालस रूप
एखादा म्हणेल किती निरागस आहे
सडपातळ बांधा, गोल चेहरा, चकचकीत त्वचा
स्वभाव तर काय
पडेल ते काम करणार
कामात डोकं पूर्णपणे बुडवणार
पण मेलं कारटं सापडलं तर खरं
गायब होणं हा ह्याचा स्वभावधर्म
किती किती म्हणून शोधायचं ह्याला
सगळी मेली भावंडं सारखीचं
नेमकं हवं तेव्हा गायब
अनिल कपूर सारखे लाल लाईटमध्ये पण दिसत नाहीत!
आपण आपलं त्यांना खास जागा द्यायची
ताटातूट नको म्हणून सर्व भावंडांना एकत्र ठेवायचं
त्यांची कामं झाली की न्हाऊ माखू घालून
हातपाय पुसून त्यांच्या घरात ठेवायचं
पण ह्यांना आहे काही त्याचं!
जातात ते जातात पण मला प्रश्न पडतो
नेमके जातात तरी कुठे आणि कसे हे चमचे?!?
ड्रॉवर मध्ये का ह्यांना पाय फुटतात?
की थानोस नावाचा कोणी काटा टिचकी वाजवतो?
की त्या पकडी बरोबर पकडापकडी खेळतात?
तुम्हाला संगते त्या लायटर आणि पकडीच्या नादाला लागूनच हे बिघडलेत!
कायम आपलं लपंडाव खेळायचा!
शाळा कॉलेजात शिक्षकांचे चमचे
ऑफिसात बॉसचे चमचे
राजकारणात तर चमचेच चमचे!
मेल्या किचनच्या ड्रॉवर मध्ये सोडून
सगळीकडे सापडतात हे चमचे!
किचन मधून आवाज येतोय
पाहते हं थांबा जरा
काय ग म्हशे, उगीच नावं ठेवते आम्हाला!
एक तर आम्हाला डब्यांमध्ये कोंडून ठेवतेस
कधी साखरेने गुदमर तर कधी मिठाने
लोणच्याच्या बरणीत अंगाची किती आग आग होते!
तीच गत लाल तिखटाच्या डब्यात
तूप आणि मध तर गिळगिळीत चिकटतं अंगाला
आणि फ्रिज मध्ये अंगात हुडहुडी भरते ती वेगळी!
त्यात उपाशी पोटी
मेथी पावडर दोन चमचे
लिंबूरस मध दोन चमचे
दुधीचा रस चार चमचे
कारल्याचा रस तीन चमचे
आपलं व्हाट्सएप मध्ये सांगतील तेवढे सगळे उपचार
तुझी चरबी काही कमी होतं नाही
आम्ही आपलं घाम गाळतोय
अर्ध आयुष्य तर आमचं जातं तुझ्या सिंकच्या तळाला!
आपलं उचलं,वापरलं,टाकलं सिंक मध्ये!
चव तरी कितीदा पहावी स्वयंपाक करताना?
आणि मग वरून भांड्यांचा डोंगर
कसं कसं आणि काय काय सहन करतो आम्ही
त्यात चोराच्या उलट्या बोंबा
शेजारी आमचे काटे आणि सुऱ्या
त्यांच्या पण ह्याचं व्यथा
कामगार युनियन आहे आमचं
वेळेत सुधार नाही तर संपच करू!
अच्छा तर सख्यांनो मी काय म्हणत होते
सगळं कसं जागच्याजागी ठेवावं
स्वयंपाक घरात कशी शिस्त असावी माणसाला
असोत, मी जरा युनियन बरोबर वाटाघाटी करते!
शेवटी कसं आहे ना
स्वयंपाक घरात असो, ऑफिसात असो वा राजकारणात
चमच्यांचं आणि आपलं जमेना
आणि चमच्यांन वाचून करमेना
👍 👍 👍
ReplyDeleteV nice
ReplyDeleteUmmm thanks but may I know who is this? We share surnames but I didn't find any info on your profile
Delete