Friday, 19 April 2019

शत्रू


Sculptures 4 (part of the sculptures series of poems which are based on these stone sculptures in Maheshwar)

Listen to the audio on

https://www.dropbox.com/s/xt7eaqdi4ly6enw/Shatru.wav?dl=0

हत्ती म्हणाला उंटाला
उठ! पाहू तू उंच की मी!
मान असली तुझी जरी लांब
माझी सोंड पण नाही लहान
पाय भक्कम पाहिलास का हा?
हाच चिरडतो शत्रूला
लढायलाही माझीच पाठ
हौदा खालच्या कापडाला खास जरीकाठ
मिरवणुकीचा मान पण माझा
मग काय रे उपयोग तुझ्या मानेचा?!?

उंट म्हणाला,
सोंड रे तुझी इतकी लांब
नाकपुड्या शेवटाला अगदी छान
मग श्वास मोठा घे एक लेका
उभा कशाला? कशाला हाल?
गप्पा मारू बसून छान

पायाखाली चिरडतोस शत्रू म्हणालास
पण नेमका शत्रू रे कोणाचा?
तू तर पडलास शाकाहारी
माणसाची हत्या करायला लावणारा माणूस
नाही का रे शत्रू तुझा?
वर बसून वार करायला
लढाईतली फक्त एक उंच खुर्ची तू
भक्कम पाय तुझे साखळीत कायम
माहुताचा रे गुलाम तू!
मिरवणुकीचा मान तुझा?
की तुझ्यावर मिरवणाऱ्याचा?!?
नको रे असला मान मला
नटवलेला अपमान जो

पाहतो आहेस हा निळा दरवाजा?
लाकडी फळ्या, लोखंडी सळ्या
वर एक मोठं लोखंडी कुलूप
तुझी सोंड काय आणि माझी मान काय
राहणार कायम दाराच्या ह्याचं बाजूला
बलवान अरे गडी तू,
एकटाच तोडू शकशील हा तू
पण धैर्य तुला होणार नाही
कारण खरा रे नेमका शत्रू कोण
तुलाही ठाऊक, मलाही ठाऊक
एक बाण किंवा एक गोळी
किस्सा आपला खतम
हस्तिदंतासाठी तुझ्या,
तुझ्याच कुठल्या भावाला लावतील तुला चिरडायला
जरीचं मग कापड ते, झाकेल तूझ्या शवाला..

आपसात लढून उपयोग रे काय?!?
माणसातला माणूस तर कधीच मेला
आपल्यातला प्राणी तरी वाचवूया
एकीने आपण जगत राहूया
प्राण आपला जपत राहूया https://www.dropbox.com/s/xt7eaqdi4ly6enw/Shatru.wav?dl=0

No comments:

Post a Comment