Monday, 8 April 2019

सावली


 You can listen to the audio here for a better experience




भुतांची सावली पडत नाही म्हणतात
पण त्याची तर पडत होती

नेहमीप्रमाणे  बागेत फिरायला गेलो होतो
आई बाळाची प्राम घेऊन गुणगुणत चालत होती
मी तिला म्हटलं थांबून गवतात खेळते
हे पण माझं रोजचंच
बागेतलं  गवत खूप आवडतं मला
त्यावरून हात फिरवला कि कश्या गुदगुल्या होतात नाही

मी मस्त गवतात लोळत होते
तेव्हाच ती सावली पडली
इतका वेळ डोळ्यात ऊन येत होतं
त्यामुळे ते किडे किडे दिसतात नाही का तसं दिसत होतं
पण हळूहळू नजर साफ झाली
मान एकदम दुखू लागली
छातीत धडधड होऊ लागलं
ते बाबा कधीकधी हॉरर पिचर लावतात
चुकून त्याचा आवाज पण कानावर पडला कि जसं वाटतं अगदी तसंच
ती सावली पडल्या नंतरच्या काही सेकंनदात जाणवलं
पिचर मधला भूत टीव्हीच्या बाहेर आलाय
पण आई तर म्हणते भुतांची सावली नाही पडत

माझ्यावरची सावली मोठी झाली
भूत वाकला होता
त्याचे डोळे माझ्या तुमच्या सारखेच
पण तो जसा पाहत होता, ते पाहून घाम फुटला
मी इतकी घाबरलेले कि पुतळ्यासारखी पडून राहिले
तेवड्यात तो हसला
म्हणाला तुझ्या आईने पाठवलंय तुला भेळवाल्याकडे घेऊन जायला
त्याचा आवाज पण माझ्यातुमच्या सारखाच
पण तरी अंगावर काटा का येत होता?
आणि त्याची सावली कशी पडत होती?

त्या भीतीत पण विचार आला आई असं कोणालाही नाही पाठवणार
त्यात हा तर भूत
मी नाही जाणार ह्याचा बरोबर
मी उठत नाही पाहून भुताने एका फटक्यात मला उचललं आणि पळू लागला
मी मोठ्याने किंचाळे पण आवाज आलाच नाही
मी खूप वेळा किंचाळत होते
पण आवाज येईना

त्याने मला एका गाडीत टाकले
गाडीत खूप अंधार होता
खिडक्या पण काळ्या
तिथे कोणाचीच सावली पडत नव्हती

आताच जाग आली मला
आजूबाजूला  प्रकाशाचं प्रकाश आहे
समोर टीव्हीत पाहिल्यासारखं दृश्य दिसतंय
आई खूप रडते आहे
बाबा डोकं खाली करून उभे आहेत
गर्दी जमलेली दिसते आहे
पोलीस काका पण आहेत
मला त्यांची ती लाल दिव्याची गाडी खूप आवडते
अरेच्च्या!! मध्ये तर मी आहे
पण मी तर इथे आहे
ती मी झोपलेली दिसतेय
फ्रॉक पण फाटला आहे तिचा
पायांचा मधून रक्त येतंय
आणि माझ्या चेहऱ्याला काय झालं
ओरबडे दिसत आहेत

एक्दम आठवलं सगळं
भुताने काय काय केलं ते
पुन्हा विचार आला
त्याची सावली कशी पडत होती?
मी मान मागे वळवून पाहिलं
माझी सावली पडत नाही आहे

1 comment: