Thursday, 18 April 2019

चिरतरुण





चिरतरुण

पेठेत फिरतांना दिसला एक जुना वाडा
धुळीचा थर त्यावर
त्या खाली दुसरा थर
थरांवर थर
पोपडे उडालेल्या भिंतींवर
कपची उडालेल्या दगडी पायऱ्यांवर
गंज लागलेल्या बिजागिरीवर
रंग उडलेल्या लाकडी दारांवर
चिरा गेलेल्या दगडी जमिनीवर
सुकलेल्या गोंड्याच्या तोरणावर
धुळीचे थर, थरांवर थर
पण मजबूत आहे पाया
प्रकाशाचा झोत लख्ख पडतोय  
नांदत आहेत नवीन जुनी कुटुंबे तयात
त्या भिंती, त्या पायऱ्या, ते खिडकी दरवाजे
आहेत आठवणींच्या तिजोऱ्या
मायेची सावली आणि पित्याची सुरक्षा देत
ऐटीत उभाय नव्या युगात 

वयाचा थर
थरांवर थर
सुरकुत्यांचा नकाशा 
थरथरते हात
सुकत आलेलं शरीर
वाकत आलेली कंबर
ठिसूळ झालेली हाडं
पण प्रकाशाची ज्योत लख्ख तेवतेय
वोटिंगला न्या म्हणतेय
व्हिडीओ कॉल वर पणतीशी बोलतेय
व्हाट्सअप्प वर फोटो पाहतेय
कवळी लावून पिझ्झा खातेय
पणती कडून लिपस्टिक लावून घेतेय
मायेची सावली आणि पित्याची सुरक्षा देत
ऐटीत उभीय नव्या युगात 
आजी माझी नव्वदीची





6 comments: