You may listen to it here कान (pun intended)
दुःख
कोणालाच नको असतं,
भोगायला
पण सर्वांनाच हवं असतं,
दाखवायला
आधी वाटायचं दिखावा म्हणजे,
"पहा मी किती खुश आहे" दाखवणं
पण हल्ली जाणवायला लागलय,
दिखावा तर दुःखाचा होत आहे!
"माझा भार मोठा की तुझा?"
"तुला नाही समजायचं मी काय भोगतोय"
"काय सांगू, माझं नशीबाचं खोटं"
"आम्हाला कोणीच समजून घेत नाही"
"तुमचं काय बाबा, सगळं छान चाललंय"
उगाच मान हलवू नका, मी करते, तुम्हीही करता....
पण का आपल्याला आपलंच दुःख मोठं वाटतं?
का आपण दुःखाची पण स्पर्धा लावतो?
एखाद्याला सांगावी काही व्यथा,
तर तो सांगू लागतो आपलीच दुःखद कथा
मन मोकळं करायला कान आता उरलेच नाहीत
कारण ऐकायचं कोणालाच नसतं,
फक्त स्वतःचं रडगाणं गायचं असतं
आपल्या कडून कोणी अपेक्षा करू नये,
म्हणून ही रडारड का?
की कुठेतरी आपलं अपयश लपवण्याची पळवाट?
की इतकी संकटं असून पण,
"पहा आम्ही कशी मात करतो" ह्याचा पुरावा?
कदाचित प्रत्येकाची कारणं वेगळी असतील
आपणचं आपली कोळीष्टक विणतो
आणि अडकतो त्या जाळ्यात!
स्वतःत इतके गुंततो,
की तडफडणारा दुसरा कोणी दिसेनासास होतो
आणि हो कोणाचीच व्यथा खोटी नसते बरं का?!?
किंबहुना त्याला ती खरीचं वाटत असते
आणि तिची तीव्रता सांगणार्याला खूप आणि
ऐकणार्याला कमीचं वाटत असते
कारण ऐकणारा आपल्याच दुःखांची तीव्रता किती आहे
ह्याचा हिशोब करत असतो
कधीतरी
करू या का प्रयत्न,
स्पर्धा न लावता,
हिशोब थांबवून,
फक्त ऐकण्याचा?
नाही तर खांदा देताना खंत होईल
की आधीच कान द्यायला हवा होता......
Well written,deep and understanding... Would like hear and read more.... 👌👏
ReplyDelete