Tuesday, 7 May 2019

तीन बोजी


I saw this amazing pic clicked by Prachi Gadkari while scrolling on Instagram.
The contradictions in this visual were so strong that I couldn't resist writing something based on it...




तीन बोजी

काळवंडलेल्या भिंतीवर चिकटवलेली पत्रकं
सगळ्या देवदेवतांची हजेरी आहे
शिव, कृष्ण, गणपती, साईबाबा
दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती
धर्म विकणं काही साधीसोप्पी गोष्ट वाटली का?!?

असो, तर ह्या सर्वांच्या आशीर्वादाच्या छत्रछायेत,
ह्या पुण्यवान भिंतीचा आधार घेत,
क्षणभर विसावा घेतलाय 
आपल्या तीन नायकांनी, त्यांच्या बोज्यांसह

एक बोजा तारुण्याचा
कपड्यात आहे यौवनाची हिरवळ,
चेहरा मात्र त्रस्त
भविष्याचा विचार करत असेल का तो?

एक बोजा वर्तमानाचा
सौभाग्याची लख्ख गुलाबी साडी,
हात मात्र कपाळावर
कदाचित विचार करतेय सद्य स्थितीच्या ताणांचा

एक बोजा उतार वयाचा
पांढरे केस, डोक्यावरून पदर,
अविर्भाव विचारात मग्न असल्याचे
बहुदा भूतकाळात हरवलीय ती

काय गम्मत आहे ना?
प्रदर्शन मांडलंय देवांचं,
धर्म विकणार्याने ह्या भिंतीवर
काळचक्रात अडकलेल्या आपल्या नायकांनसाठी मात्र
काही काळ पाठ टेकायला जागा आणि सावली,
ह्या खेरीज बाकी काहीच करू शकत नाहीय
ही "पुण्यवान" भिंत...

एकीकडे आहेत ही मेहनती लोकं,
पोटापाण्यासाठी रोज धडपड करणारी,
रक्ताचं पाणी करून पैसे कमावणारी
तर दुसरीकडे आहेत धर्माचा धंदा करणारी,
धर्मा वरून रक्त सांडणारी,
देवांचं मार्केटिंग करणारी!
मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल सारखी
देवांची पत्रकं चिकटवणारी!
तसं देवही मोस्ट वॉन्टेडअच आहे म्हणा
कारण कष्ट करण्यापेक्षा,
हात जोडणे केव्हाही सोपेच!

माडगूळकरांचे शब्द आठवले -
"देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी
देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी..."

देवळात, मस्जिदित, चर्च मध्ये
अश्या एक ना अनेक प्रार्थनास्थळात,
राजकारणात, धर्मात, पत्रकात
कैद केलीय आपण आपली देवाची संकल्पना
ह्या अश्या परिस्थितीत,
चराचरात असलेला, आपल्यात असलेला,
देव आहे का जागा?!?

काळाच्या घावांवर फुंकर मारणारा
कोणी सापडेल का आपल्या नायकांना?!?

No comments:

Post a Comment