Tuesday, 4 June 2019

भातुकली





You can listen to it here-
भातुकली


भातुकली

घर घर खेळण्यात, येई खूप गंमत
सोनेरी ते दिवस, मोजावी नाही लागायची कसलीच किंमत

चटईचे असे घर चिमुकले
Property rate, EMI चे भूत तोवर मानेवर नव्हते बसले
तेवढूश्या जागेत पण बसे
Hall, bedroom, kitchen
मन तेव्हा सांगत नसे 'तू दिखावा कर'

बडीशेप आणि साखर बने
भात, डाळ, भाजी
'बडीशेप नक्की संपते कशी' विचार करे आज्जी
गूळ, चिंच, बर्फ चोरता आलं तर असे मेजवानी
मग चोरणारी बने त्या दिवशीची राणी!




छोट्याश्या कुकर मध्ये साखरेचे दाणे चार,
दोन थेंब पाणी त्यात
आणि आई बोट बुडवून माप घेते
ती नक्कल करून शिट्ट्या वाजवायच्या जोरदार!
गुळाचा तुकडा सापडला की पोळपाटावर त्याला करायचा चपट आणि आजचं होळी समजून खायची पुरणपोळी!

इवलीशी शेगडी, इवलीशी भांडी,
पितळेची घागर आणि मातीची हंडी
पिटुकल्याश्या वाटीत हळदीचं पाणी बने आमरस
आणि कागदाचे तुकडे कढईत तळुन तयार पुऱ्या!
तेल, काडेपेट्या मात्र वरच्या फळीवर विराजमान
न लागू द्यायला आमच्या हाती
नाही तर चटईच्या घरा सोबत खरं घर पण
जळायची आई बाबांना भीती!

बार्बीचं लग्न लावायचं हि-मानशी
'इतक्या लोकांचा स्वयंपाक कसा करणार?'
म्हणून त्यांच्या रिसेपशनला फक्त टी!
चिमुकल्याश्या कप मधून खोटाखोटा चहा बशीत ओतायचा आणि भुरके मारण्याचा आवाज करत
"वाह! किती छान"
अशी आपलीच आपल्याला शाबासकी द्यायची!



एकूण घाई मोठं होण्याची,
'एकदा का मोठे झालो की मनात येईल ते करायचं,
हवं तसं खायचं, पाहिजे तेव्हा झोपायचं,
अभ्यास, परीक्षा काहीच नाही,
मस्त मज्जा करत जगायचं!'
 वीस एक वर्षे भविष्यात डोकावून पाहता आलं असतं
 तर म्हणालो असतो
 "नको ते मोठं होणं,
 भातुकलीचं आपली बरी
 लग्नाची कशाला घाई?
 हवी जवळ आई!"

घर-घर खेळता खेळता मोठे कधी झालो समजलचं नाही
मोठाली भांडी, मोठाला कुकर,
मोठी ती शेगडी आणि मोठं ते घर
Sundrop oil ची जुनी आड आठवते?
ज्यात मुलगा लहान आणि सर्व जिन्नस मोठे होते
तसचं सौंसारच्या सुरवातीला,
आपण पिटुकलेच पण बाकी सगळं मोठं असं वाटायचं

भातुकलीचा खेळ सोडायला मन कधीच तयार नसते
खऱ्या कूकरच्या खऱ्या शिट्टया,
खऱ्या पुऱ्या आणि हळद नसलेला आमरस
बडीशेपचा तो भात आणि बडीशेपची ती आमटी,
मात नाही करू शकणार त्यांची
पंचपक्वान्नांची थाळी कुठची
अश्या ह्या बालपणीच्या गंमतीजमती

जाता जाता छोटासा देते एक सल्ला
अगदी भातुकली एवढा
'जग फार बदललं आहे,
खेळही बदलायला हवा
मुलींसोबत मुलांनाही घर-घर खेळायला लावा'



No comments:

Post a Comment