Listen to it on 66
साधारण सहावीत असल्यापासून, "आम्ही आता मोठे झालो, स्कूल बसने नाही जाणार" हा हट्ट मी आणि माझी बहीण करू लागलो. आता ओला, उबेर आपल्याला दारापाशी यायला हवी असते पण शाळेच्या बसच्या त्या फायद्यापेक्षा 'आम्ही आता लहान नाही' हे सिद्ध करणं जास्त महत्वाचं होतं. पंचविशी ओलांडल्यावर त्याच पालकांना 'आम्ही अजून लहान आहोत' हे सिद्ध करायला लागलो!
तर आमची कटकट ऐकून सातवी पासून BEST ने जायची परवानगी मिळाली. बस स्टॉपला पोचायलाच पंधरा मिनटं चालावं लागायचं पण मनात थोडीशी भीती, थोडासा उत्साह ह्याची वेगळीचं गम्मत होती.
"इतका काही उशीर नाही झालाय आपल्याला"
"ही बस जाऊदे ह्यात खूप गर्दी आहे"
उगीच एकमेकाला कारणं द्यायची.
खरं कारण एकचं- डबल डेकर पकडणे!
त्याची उत्कंठा काही निराळीच होती
एका बस वर दुसरी बस!
किती राजेशाही वाटायची ती बस, एखाद्या परिकथेतून आल्यासारखी. राजकन्येला घ्यायला जसा तिचा रथ येतो तशीच ही भव्य जादुई गाडी आपल्यासाठी खास येत आहे असं वाटायचं. कदाचित हे इतकं इतरांना नसेल वाटत पण मी बाहेरच्या जगापेक्षा मनातल्या जगातचं असायचे त्यामुळे सगळंच जादुई वाटायचं.
धक्काधक्की करून आत शिरतांना मात्र परिकथेतून बाहेर यावचं लागायचं. आणि ह्यात फक्त बसमध्ये शिरणं नसून वरच्या मजल्यावर पोचायचा ध्येय. भव्य बंगला आणि घराच्या आतून वरच्या मजल्यावर जायला जिना हे फक्त चित्रपटानंमध्येच दिसायचं. त्यामुळे डबलडेकरच्या जिन्याचं कौतुक वाटे. त्यात हलणाऱ्या बसमध्ये तो अरुंद जिना चढायची थ्रिल!
खालच्यापेक्षा वरच्या मजल्यावर गर्दी जास्त असायची आणि त्यात नव्वद टक्के शाळेचीच मुलं. पण त्या चेंगराचेंगरीतसुद्धा जरा खिडकीतून डोकावता आलं की आपण उडत आहोत असं वाटायचं! विमान प्रवास फक्त पु.लं च्या अपूर्वाई मध्ये अप्रुपाने वाचलेला. त्यामुळे कदाचित डबलडेकरचं अप्रुप जास्तं. आजूबाजूचांच्या चेहऱ्यावर पण तोच उत्साह असायचा. साधारण सगळेच मध्यम वर्गीय कुटुंबातले विद्यार्थी असल्याने आमच्या एकक्तरीत कल्पनाशक्तीने बसच्या त्या वरच्या मजल्याचं विमानात रूपांतर व्हायचं!
काही आकडे मनात कोरले जातात. सायनहुन दादरला 66 नंबरची डबल डेकर जायची. आता ज्या आतुरतेनं विकेंडची वाट पाहतो त्याचं आतुरतेनं सहासष्ट ( आताच्या सपोसेडली स्लो मुलांसाठी- "साठ सहा") नंबरच्या बसची वाट पाहायचो.
कधीतरी धकाबुकीत यशस्वी होऊन पुढे जायला मिळायचं. डबल डेकरची ती पुढची खिडकी म्हणजे जणू स्वर्गचं! बसायला मिळणं अशक्य पण उभ्याउभ्या का होईना त्यातून डोकवायचं. घामटलेल्या चेहऱ्यावर वारा गुदगुल्या करायचा.
आता ऍडवेंचर स्पोर्ट्स मध्ये पण त्या खिडकीतून डोकावल्याचा थ्रिल येणार नाही. त्यात सुट्टीच्या दिवशी फिरायला गेलं तर त्या पुढल्या सीटवर बसायलासुद्धा मिळायचं! त्या सीटवर बसून त्या छोटेखानी खिडकीतून डोकावताना सम्राट असल्यागत वाटायचं! सर्व जग खाली आणि आपण वर. प्रवास संपूच नये असं वाटायचं. आयुष्यात बहुदा तेव्हाच मुक्कामी पोहचायची घाई नसून प्रवासाचा आनंद घेता आला.
आता डबल डेकर पण कमी झाल्या आणि छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद देखील. मागच्या वेळीस पुणे-मुंबई प्रवासात ही बालपणीची जादुई बस दिसली आणि एखादा चित्रपट पाहिल्यागत भराभर आठवणी डोळ्यांसमोरून गेल्या. फोटो काढायला म्हणून खिडकी खाली केली, पावसाचे थेंब चेहऱ्यावर पडले, वाऱ्याने गुदगुल्या केल्या, अगदी हाडांपर्यंत शांत वाटलं.
कदाचित फक्त खिडक्या खाली करण्याची गरज आहे. कुठेतरी आपल्यात अजूनही ती निरागसता शिल्लक आहे. मनाच्या काचा पुसूया
खिडक्या उघडूया
मनातल्या मनात का होईना, डबल डेकरच्या वरच्या मजल्याच्या पुढच्या सीट वर जाऊन बसूया, प्रवासाचा आनंद घेऊया......