You can listen to this on-
दोन दिवस खूप डिस्टबर्ड होते, कारण काय ओ, नेहमीचं
तुमचं आमचं सारखाचं - "नाती"...
नाती म्हणजे ना एक न उलघडणारं कोडं आहे.
"त्यांना जपावं, ती तोडू नयेत, रक्ताची नाती म्हणजे सर्वात घट्ट" वगैरे वगैरे, आपण नेहमीचं ऐकतो.
हल्ली व्हाट्सएप वरचे मेसेज तर संस्कार चॅनलला टफ देतात! पण वस्तुस्थिती काय आहे? काय असते?
तुमची आमची सारखीचं....
काही नाती रक्ताची असो, जवळची असो नाही टिकत
कारण प्रयत्नसुद्धा दोन्ही बाजूने व्हावे लागतात.
काही जणांचा स्वभाव, आयुष्याचा दृष्टीकोन, विचारपद्धती
हे काही केल्या नाही जुळत आपल्याशी.
मग का बळजबरी हे नात्यांचे धागे बांधून ठेवावे?
हे धागे नसून बेड्या होऊन जातात!
प्लेन मध्ये सांगतात पहा इमरजंसी मध्ये पहिले स्वतःला ऑक्सिजन लावावे आणि मगचं दुसऱ्याची मदत करावी
तसं काहीसं इतेही लागू पडतं. आपलं मानसिक संतुलन टिकवणं सर्वात महत्वाचं, त्यानंतर तुमच्या जवळच्या काही लोकांना, नात्याने नव्हे हं, मनाने जवळ असलेले त्यांना जपावं. बळजबरीच्या नात्यांने फक्त त्रास होत असेल
तर ती कीड वेळीचं आपल्या आयुष्यातून काढायला हवी!
आपल्या सर्वांनाच हा अनुभव असेल की मैत्रीची नाती किंवा कधीकधी काहीही संबंध नसून अचानक एखाद्या प्रसंगामुळे झालेली नाती ही जास्तं जवळची ठरतात.
आपल्या सुखात मनापासून खूश होणारे, आपला मत्सर न करणारे, आपल्या दुःखात खरं सांत्वन देणारे, प्रसंगाच्या वेळीस मदत करणारे, हेचं खरे नातेवाईक!
ह्यात आणखी एक ट्विस्ट असतो बरं का?!?
"मी ना त्याला दहा तोळ्याची मदत केलेली, त्यानं मात्र मला पाचंच तोळ्याची केली, कसं कदर नाही पहा!"
"वीस वर्षांपूर्वी आम्ही मदत केली नसती तर आज हा इथे नसता, त्यामुळे त्याच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय हा आम्हाला विचारूनचं घेतला गेला पाहिजे! त्यांने आयुष्य कसं जगावं हे आम्ही ठरवणार!"
"हो केलं मी त्याचं नुकसान, तर काय झालं? मागे मी मदत केली नसती तर काय झालं असतं?"
असे एक ना अनेक प्रसंग तुम्ही सगळ्यांनीच अनुभवलेले असतील. मदत सोन्यासारखी तोलूनमापुन करणारी लोकं.
नात्यांच्या हिशोबाचा एक स्पेशल फोल्डर कायम ह्यांच्या डोक्यात तयार असतो! नात्यात हिशोब आला की नात्यांचं डीमोनेटायझेशन झालचं म्हणून समजा!
नाती टिकवण्याचा प्रयत्नचं करू नये असं माझं मुळीचं म्हणणं नाही, जरूर करावा पण सारखचं तोंडावर पडत असाल तर काही तोंडं न पाहिलेलीचं बरी!
डोक्यात त्रागा असल्यांने ह्या वर अजून खूप लिहू शकेन
पण मग ते टोकाचं होईल. सायकायट्रिस्ट वर इतके पैसे खर्च केले आहेत की ते म्हणतात तसं बालन्सड राहण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे!
तर डोक्यात वाफ जमून जमून जेव्हा शेवटी माझी शिट्टी वाजली तेव्हा नकळत मम्माला फोन लावला गेला. इकडची तिकडची चौकशी केली पण तिला बहुदा आवाजा वरूनचं समजलं की हिची शिट्टी वाजलेली आहे!
"तू काय म्हणतेस?" हे तीन शब्द ऐकताच, माझी वरबल डिसेंटरी सुरू झली. आधी राग, मग रडणं, मग ओशाळणं,
मग "तुला उगाचं त्रास दिला" ह्याचा अपराधीपणा वाटून घेणे
अगदी ठरलेली सायकल!
अशा वेळी मम्माचं लागते ना? बाबा कितीही जवळचे आणि अगदी व्यवस्थित विचार मांडणारे वगैरे असले तरी ते योग्य तेच बोलणार म्हणजे तुमच्यासाठी योग्य नाही हं, समाजात जे योग्य मानलं जातं ते!
"सगळीकडे असचं असतं",
"तुझही चुकतंय",
"एवढा राग कशाला यायला हवा?"
"आपल्याहून मोठे प्रॉब्लेम्स असणारे किती लोकं आहेत?" "तुझं कमीतकमी हे आणि ते तरी चांगलय!"
असे शहाणपणाचे बोल ऐकण्याची आपल्या मनाची तयारी नसते कारण शिट्ट्या ऑलरेडी वाजलेल्या असतात!
अश्या वेळी मायेची हळुवार फुंकरचं लागते (व्हाट्सएप वरच्या मेसेजेसचा परिणाम!)
मम्मा मात्र शांतपणे ऐकून घेते, हो ला हो म्हणते,
"तुझं अगदी बरोबर आहे" सांगते, जे ऐकायला आपण सर्वात जास्तं उत्सुक असतो!
पण हळूच एक "पण" पण टाकते
"सगळं बरोबर आहे तुझं पण जरा असा पण विचार करून पहा." सावधपणे सल्ला देते.
शेवट कायम ठरलेला,
"काही खाल्लं आहेस का? आधी खाऊन घे...
थोडा वेळ झोप निवांत...लोकांचा विचार करू नकोस... नाही तर इथे येतेस का सरळ काही दिवस?"
थांबलेले अश्रू पुन्हा गळू लागतात. मग नंतर फोन करते म्हणून फोन ठेवायचा.
रडून डोकं दुखत जरी असलं तरी हलकं वाटतं.
काही विशेष मार्ग वगैरे सापडलेला नसतो.
परिस्थितीही काही बदललेली नसते.
नात्यांचा गुंता तसाच राहतो.
पण बदला असतो आपला दृष्टिकोन,
आतून एक उर्जा मिळते चालत राहण्याची..
दगड फेकणारे कधीच कमी होणार नाहीत पण आपण आपल्याला ते किती लागू देतोय हे अपणाचं ठरवायचं
आणि जखम बरी करायला आहेचं "मम्मा"....