साधारण पाचच्या सुमारास बालकनीत उभी होते,
मिलिंद इंगळे कानात कुजबुजला,
"ऊन जरा जास्तचं आहे",
प्रत्येक मराठी माणूस हे एवढ्या वरून,
"गारवा" गाऊ लागतो
त्या वरून पाऊस आठवला आणि मग अर्थातच
"ये रे ये रे पावसा,
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा,
पाऊस आला मोठा"
बोबड्या बोलीत आपण सर्वांनेचं हे गायलंय
थोडक्यात स्वतःचं धुता येत नव्हतं तेव्हापासून,
'पैसा फेक तमाशा देख' डोक्यात बिंबवलं गेलंय,
खोट्या पैसांवरून क्रिपटोकरन्सी आठवलं
आता पावसाला बिटकॉईन द्यावे लागतील
किंवा डॉजेकॉईन, पाहू एलॉन दादाला विचारते
हे आणि असेचं अजून शुल्लक विचार
डोक्यात चालू होते,
जेव्हा बालकनीच्या एका कोनाड्यात उभी राहून,
वारा खात होते...
झाडे माना डोलवत होती,माझ्याचं प्रमाणे तेही बहुदा
जरा जास्तचं कफ सिरप प्यायले होते...
इंगळ्यांच्या मिलिंदावरून,
सोमणांचा मिलिंद आठवला
शरीर गार होतचं,
हृदयात पण कसं गारगार वाटू लागलं
काही वेळाने, वारा, सूर्यास्त, डोलणारी झाडे,
नाकातून वाहणारा शेमबुड, खवखवणारा घसा,
सगळं कसं छान एकत्रित आलं होतं
मोगरा, गुलाब, विक्स, आणि बामच्या वासाने
एक जादुई सुगंध निर्माण केला होता
सद्य परिस्थितीत नाकाला गंध घेता येतोय
ह्या सारखा दुसरा आनंद नाही!
"सर्दी झालीय आणि वारा कसला खातेस?!?"
मिलिंद इंगळेच्या आवाजाला काय झालं?
"जा वाफारा घे आणि कानात कापूस घाल!"
हा तर आईचा आवाज होता
आभाळ मनात दाटलं....