Thursday, 25 March 2021

आमची आई

 Listen to this on - https://www.dropbox.com/s/5uaaoneqh0fbon1/Aai%201.m4a?dl=0




शाळेतल्या कवितांमधली आज्जी आठवते का?!?

भरपूर लाड करणारी, सतत खाऊ देणारी, 

सगळे हट्ट पुरवणारी...

आमची आज्जी तशी नव्हती बरं का,

कारण मुळात ती आमची आज्जी नव्हतीच

ती आमची "आई" होती

काव्यात्मक म्हणत नाहीय

मध्यम वर्गीय पालकांना नोकरी करणं भाग होतं

लहानचं मोठं आईनेचं केलं

फक्त जन्माला तेवढं घातलं नाही तिने आम्हाला

आम्ही सगळी भावंडं तिला आईचं म्हणायचो

त्यामुळे कवितेतल्या आज्जी सारखं सतत लाड करत राहणं इतकं सोप्पं आज्जीपण नव्हतं तिच!

साम, दाम, दंड, भेद असे सर्व उपाय ती वापरत

गरजेप्रमाणे डोक्यावर मायेचा हात 

आणि गरजेप्रमाणे त्याचं हाताने पाठीवर धपाटा!

चार नातवंड मोठी करणं, त्यात दोन एकाचं वयाची

खरचं त्यावेळी तिला नोबेल शांतता पुरस्कारासाठी 

नामांकित करायला हवं होतं  

आणि हो, आम्हाला भले दमदाटी करून 

शिस्त लावत असेल, 

पण चुकून का कोणी बाहेरचं 

तिच्या पिल्लांना काही बोललं 

तर मग काही खरं नाही!


आजोबा खूप लवकर वारले,

त्यात आई तरुणपणी आजारी असतं, 

पण मानसिक बळ मात्र थोर,

अर्थात मुलांची, लेकिसुनांची साथ होतीच

पण तिचा आशावाद आणि तिच्या जिद्यीने तिने शहाण्णव वर्षाच्या आयुष्यात प्रत्येक अडचणीवर मात केली!


विचार करा, गावात वाढलेली, 

अगदी प्रार्थमिक शिक्षण झालेली एक तरुण मुलगी,

त्या काळानुसार लवकर लग्न झालं,

मग मुंबई सारख्या शहरात सौंसार मांडणं, 

सामाजिक कामात पुढारी असलेल्या नवऱ्याला साथ देणं, सतत पाहुण्यांची उठबस करणं , 

भावा भाच्यांना आईसारखं सांभाळणं 

काय नाही केलं तिने?!?


मला आठवतंय आमच्या लहानपणी, 

मराठी पेपरच्या हेडलाईन्स वाचायची, 

अभिमानाने सांगायची की आजोबांने शिकवलं. कागदपत्रांवर स्वतःची सही केली 

की तिच्या डोळ्यात वेगळीच चमक यायची. 

अगदी आता आता पर्यंत थरथरत्या हाताने का होईना

 सही करायची.


त्यात बदलत्या काळानुसार ती स्वतःला बदलत गेली. 

चुली पासून स्टोव्ह ते शेगडी, 

रेडिओ पासून टीव्ही ते कॉम्प्युटर,

रोटरी फोन पासून कॉर्डलेस ते मोबाईल, 

शहाण्णव वर्षात असे अनेक बदल तिने पाहिले 

आणि स्वीकारले, उत्साहाने शिकून घेतले.

 हा प्रोफाईलला लावलेला फोटो माझ्या खास आवडीचा कारण गच्चीत फिरतांना मी फोटो काढत होते 

तर स्वतः म्हणाली चल सेल्फी काढुया! 

कँडिड फोटोसवर मात्र जाम चिडायची, 

मला सांगून काढ म्हणायची आणि 

पदर सावरून, बॉर्डर सरळ करून, ताठ बसून 

मग काढायला परवानगी द्यायची. 


बाकी सगळे बदल स्वीकारले असले 

तरी नऊवारी मात्र शेवटपर्यंत नेसली. 

आता झेपत नाही मॅकसी घाल, किमान सहावारी नेस, 

सगळं सांगून झालं पण एक वाक्य ठरलेलं

"झेपतय तोवर करायचं". 

ह्याचं वाक्याच्या जोरावर 

फक्त नऊवारी टापटीप नेसणे, 

मॅचिंग ब्लॉउस घालणे, 

कडक काष्टा काढणे, इतकचं नाही तर

स्वतःची नऊवार स्वतः हाताने धुऊन वाळत घालायची! सुनांचा आग्रह झाला, बायका ठेऊन झाल्या

पण तिला काही पटेना. 


हौस आणि टापटीपणा काही विचारू नका, 

नऊवारी उंचीला चांगली हवी, 

कापड मऊ हवं,

रंग उठून दिसायला हवा,

ब्लॉउस परफेक्ट मॅचिंग हवं, 

साडीचं केळं जरा लहानमोठं झालं तर पुन्हा नेसायची! हातात पाटल्या, 

गळ्यात जोंधळी पोत व पोवळ्याची माळ, 

कानात कुड्या आणि साखळ्या...

माहेरच्या दर फेरीला,

माझ्या कडून ब्लॉउस मॅच करून घ्यायची, 

"हा वापरून वापरून एक शेड लाईट झाला 

आहे का" वगैरे विचारायची.

मी आयुष्यात कधी मॅचिंग ब्लॉउस घातला नाही त्यामुळे मनातल्या मनात हसू यायचं.

मला कायम म्हणायची -

"हे काय भूताटक्या सारखे केस सोडले आहेस, 

नीट विंचर, गळा मोकळा ठेऊ नये" इत्यादी...

मला चित्रविचित्र दागिने आवडतात, 

तसचं एकदा घातलं होतं तर आई म्हणाली - 

"हे काय बैलाचा गळ्यात घालतात तसं घातलं आहेस!"


तिच्या तारुण्याच्या अनेक आठवणी 

ती आम्हाला सांगत

अगदी बाबा, काकांने कश्यावरून मार खाल्लाय, 

आजोबा कसे आत्यासाठी फ्रॉक शिवतं

त्या पासून 

आजोबाने थिएटरला कुठले पिचर दाखवले ईथपर्यंत. 

आजोबांबद्दल इतक्या गोष्टी सांगितल्या आहेत

की त्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटलोय असं वाटतं. 

ठोकरच्या चाळीतली खोली, 

मुंबईत कुठेकुठे फिरली आहे, 

गावचं बालपण, तिचं लग्न, 

सुनांच्या बघण्याचे कार्यक्रम, 

एक ना अनेक आठवणी सांगितल्या आहेत. 

कुठलाच बोध शब्दात न मांडता 

ती ह्या आठवणीनंमधून अप्रत्यक्षपणे सांगत....


नातसून, नात जावई, ह्यांनाही आमच्या इतकचं प्रेम केलं, नातवंडांसारखचं वागवलं

पण पणतींसाठी मात्र खास माया होती. 

अगदी शेवटच्या क्षणापर्यंत,

त्यांची काळजी घ्या हे सांगत होती.

तिची माया ही फक्त आमच्या पुरता मर्यादित नसून, नातेवाईकांपासून शेजाऱ्यांपर्यंत सगळ्यांची ती आई होती. 


लग्न झाल्यावर सुद्धा कायम तिच्या समोर नसले

तरी तिचं बरोबर लक्ष असायचं. 

एकदा सुरवातीच्या काळात माहेरी गेली असतांना,

तिने माझी पाण्याची बाटली उघडून पहिली. 

मग म्हणाली "बूच स्वछ आहे, खाच्यांमध्ये सुद्धा मळ नाहीय म्हणजे घर नीटनेटकं ठेवत अशील!"

अशी ती शितावरून भाताची परीक्षा पहायची

माझ्या कडे मोशीला आली तेव्हा,

कचराकुंडीच्या झाकणापासून ते 

बालकनीतल्या कुंड्यातल्या झाडांपर्यंत

सगळं बारकाईने तपासलं.


पुण्याच्या एका फेरीत,

स्वातीच्या लग्नाची खरेदी करायचं ठरलं. 

सकाळी साधारण दहा ते रात्री आठ 

अक्खा लक्ष्मी रोड पालथा घातला, 

अगदी लग्नाच्या शालू पासून, नऊवारी 

ते देण्याघेण्याच्या साड्यांपर्यंत

ह्यात पुढारी अर्थातच सावित्री कर्ले 

आणि पूर्ण वेळ उत्साह तितकाचं. 

आठच्या सुमारास ड्रायव्हरला फोन केला,

गाडी घेऊन यायला, तेव्हा त्यानेही अचंबित होऊन

विचारले- "त्या आज्जी अक्खा दिवस

तुमच्या सोबत खरेदी करत होत्या?!?"

त्या नंतर हॉटेलमध्ये जेवण झालं, 

सगळेच दमले होते म्हणून पटकन बिल मागवलं 

तर आई म्हणाली "आईस्क्रिम कुठलंय विचार!"

आईस्क्रीमची खूपच आवड होती तिला.

काही वर्षांपूर्वी पर्यंत कॉर्ननेटो खायची,

काजू बदाम चोखुन बाजूला करुन. 

नंतर मात्र कप आईस्क्रिम वर आली. 


असाचं एक तिचा उत्साह, धमक, आणि कुतूहल

दाखवणारा प्रसंग म्हणजे,

जेव्हा अम्ही तिला देहू व त्रिवेणी संगमला नेले. 

एखाद्या ठिकाणी जरा जास्त चालणं आहे

किंवा पायऱ्या आहेत तिथे पुढे नको येउस म्हटलं 

तर ती कसलं काय ऐकतेय!

सगळं फिरली, अगदी इंद्रायणीत बोटींग सुद्धा केली. 

एक तरुण जोडपं होतं 

आणि ती मुलगी बोटीला घाबरत होती

तर ही खमकी म्हातारी तिला सांगते 

"अगं मी बसलेय तर तू काय घाबरतेस!' 


एकदा बोलता बोलता म्हणाली,

अजून काय तो मॉल नाही पाहिला. 

आदित्यने लगेच गाडी काढली 

आणि आई, मम्मा व बाबांना घेउन 

गोरेगावच्या ओबेरॉय मॉलला गेलो. 

तिने भरपूर प्रश्न विचारले, 

सगळी माहिती हवी होती तिला. 

प्रत्येल दुकानात डोकावून पाहिलं. 

वरच्या माळ्यावर जायला 

तिला म्हटलं लिफ्टने जाऊ 

तर हिला एस्कलेटरने जायचं होतं!! 

एकतर आधी फिरता जिन्हा सांगून समाधान नाही, एस्कलेटर बोलायला शिकली 

आणि मग म्हणे न्या मला धरुन. 

ही अगदी बिंदास, आमच्याचं पोटात गोळा!

दोन एक तास मॉल फिरून झाल्यावर 

घरी परतायला निघालो तर 

आदित्य सहज म्हणाला दादरला जायचं का आईकडे,

ही एका पायावर तयार! 

मम्मा बाबा म्हणाले आम्ही दमलो आणि रिकशाने परतले. आम्ही कूच केली दादरच्या दिशेने. 

त्या पोपटलाल चाळीचे लाकडी जिने चडून ही गेली

केवळ नातीचं सासर पाहायचं म्हणून.

असे आईचे एक ना अनेक किस्से आहेत...


फार विचार न करता,

मनात येईल तसं लिहीत गेले, 

अजून खूप आठवणी आहेत, 

तिच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत...

तिच्या आठवणी तर कायम मनात राहतील पण

तिचा आशावाद, 

तिचा खंबीरपणा, 

तिचा ताठ कणा, 

आयुष्याने टाकलेल्या प्रत्येक बॉउन्सरवर

मात करायची क्षमता 

ह्यातलं किमान एक टक्का जरी 

आत्मसात करता आलं तर 

तिचं तिला खरी आदरांजली होय...

March 25, 2021